लोणी काळभोर, (पुणे) : सावित्रीबाई फुले अनेक मुली आणि महिलांसाठी आदर्श आणि प्रेरणा असून मुली आणि महिलांच्या शिक्षणात विशेष योगदान दिले आहे. अनेक महिलांना साक्षर केले मात्र, आज त्यांच्याच विचारातून प्रेरित होऊन महिलांना सक्षम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव यांनी केले.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ येथे स्त्रियांसाठी साक्षरतेच्या वाटा प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. अनंत चक्रदेव बोलत होते.
यावेळी सावित्रीबाईंच्या प्रतिमेस एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे आणि एमआयटी स्कूल ऑफ इंजीनिअरिंगच्या संचालिका डॉ. रजनीश कौर बेदी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. राहुल मोरे, डॉ. विरेंद्र शेटे, डॉ. अंजली भोईटे, शिवशरण माळी, डॉ. अतुल पाटील, डॉ. सुजित धर्मपात्रे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
डॉ. रजनीश कौर बेदी म्हणाल्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त केवळ प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरी न करता त्यांच्या कार्याला हातभार म्हणून विद्यापीठातील महिला कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन सक्षमीकरणासाठीचे कार्य करावे. डॉ. समीरन वाळवेकर यांनी ही आपले विचार व्यक्त केले.