हडपसर : सोसायटीतील सदस्यांनी काढलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केल्याच्या रागातून गृहनिर्माण सोसायटीच्या महिला अध्यक्ष व त्यांच्या पतीला, सोसायटी मधील पाच जणांनी बेदम मारहाण करून, पतीची जीभ कापल्याची घटना फुरसुंगी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी (ता. २८) घडली आहे.
याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पाच जणांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार दाम्पत्य व आरोपी एकाच सोसायटीत राहण्यास आहेत. सोसायटीतील रहिवाशी असणाऱ्या व्यक्तींचा तक्रारदारांच्या पतीने एक ओम हाईट्स ऑपरेशन या नावाने व्हॉट्सअप ग्रुप काढला होता. त्यात सर्व सदस्य होते. तक्रारदार यांचे पती या ग्रुपचे ॲडमिन होते. यावेळी त्यांनी यातील एका आरोपीला ग्रुपमधून रिमूव्ह केले. ग्रुपमधून कढून टाकल्याने आरोपी मनात याचा राग होता. त्यांनी रिमूव्ह का केले असा मॅसेज तक्रारदारांच्या पतीला व्हॉट्सअपला टाकून विचारणा केली. पण, त्यालाही तक्रारदार यांच्या पतीने रिप्लाय दिला नाही.
दरम्यान, तक्रारदारांच्या पतीला फोन करून भेटायचे आहे, असे सांगून भेटण्यास बोलावले. तक्रारदार व त्यांचे पती ऑफिसमध्ये असताना आरोपी त्या ठिकाणी आले. त्यांनी ग्रुपमधुन मला का काढून टाकले असे विचारणा केली. त्यावेळी ग्रुपमध्ये कोणीही कसलेही मॅसेज करत असल्याने ग्रुपच बंद केला असल्याचे सांगितले. असे म्हणताच पाच जणांनी तक्रारदारांना मारहाण केली. त्यांच्या तोंडावर बुक्की मारल्याने तक्रारदारांची जीभ कापली गेली व ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या जिभेला टाके पडले आहेत. याप्रकरणी पाच जणांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.