अमळनेर : सिनेस्टाईलने हेअरकट ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेने मोठा दणका दिला आहे. मंगरुळ (ता. अमळनेर) येथील स्व. अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे विस्कटलेले केस नीट करण्यासाठी आणि त्यांना वळणदार करण्यासाठी केस कर्तनाचा अनोखा कार्यक्रम घेतला आहे. या शाळेने राबविलेल्या अनोख्या विक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
खेळाडू आणि चित्रपटातील हिरो किंवा काही विशिष्ट व्यक्ती आपली आगळी वेगळी हेअर स्टाईल करून सामान्य व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करत असतात. साहजिकच शालेय विद्यार्थी देखील त्यांचे अनुकरण करून वेगवेगळ्या फॅशन करीत असतात.
विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी आरटीई कायद्याच्या बंधनामुळे कठोर शिक्षा बंद झाली असल्याने मुलांना शिस्त लावणे शिक्षकांना त्रासदायक होते. विद्यार्थ्यांना अनेकदा कटिंग करून या असे सांगितले की विद्यार्थी देखील आता राहुद्या असे सांगून टाळाटाळ करतात. तसेच गरीब पालक देखील आताच कटिंग चा खर्च झाला असे सांगून वेळ मारून नेत होते.
शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना केसासंदर्भात शिस्त लावण्यासाठी मंगरुळ येथील स्व. आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक पाटील माध्यमिक विद्यालयात शिक्षक संजय पाटील यांनी स्वखर्चाने अनोखा केस कर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला.
नाभिकालाच शाळेत बोलावून केसांचे वळण बिघडवलेल्या विद्यार्थ्यांना समोर बसवून सर्व विद्यार्थ्यांच्या समक्ष त्यांचे विस्कटलेले केस नीटनेटके करून घेतले. त्यामुळे आपोआपच इतर विद्यार्थ्यांना शिस्त लागली.
दरम्यान, या उपक्रमासाठी मुख्याध्यापक प्रकाश पाटील, प्रभूदास पाटील, अशोक सुर्यवंशी राजेंद्र पाटील, सीमा मोरे, सुषमा सोनवणे, शीतल चव्हाण,राहुल पाटील यांचे सहकार्य लाभले.
पालकांनी देखील या उपक्रमाचे स्वागत केले. त्यांनी देखील आमची एक जबाबदारी परस्पर पार पाडली गेली म्हणून आनंद व्यक्त केला.