पुणे –सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा ते उंबऱ्या गणपती चौकापर्यंतच्या डीपी रस्त्यावरील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता लोकमत प्रेस ते सावित्री गार्डन या ३० मीटर डीपी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात ३५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती पालिकेच्या पथविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या डीपी रस्त्याची पाहणी करण्यासाठी पथ विभागाचे शाखा अभियंता नरेश रायकर, माजी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, बाळासाहेबांची शिवसेना गटाचे युवा सेना शहर प्रमुख निलेश गिरमे आदींनी भेट दिली.
गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेल्या डीपी रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी जागा देण्यासाठी सहमती दर्शवल्यामुळे डीपी रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या जो निधी उपलब्ध आहे त्यात मार्चपर्यंत काम करण्यात येणार असून पुढील चालू वर्षात निधीची मागणी करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
वडगाव खुर्द ते सावित्री गार्डन हा ३० मीटरचा डीपी रस्ता विकसित झाल्यानंतर धायरी आणि डीएसके विश्व परिसरातील हजारो नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
डीपी रस्त्यामध्ये ज्या जागामालकांच्या जमिनी दिल्या आहेत त्यांना टीडीआर आणि एफएसआय देण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेला रस्ता शेतकऱ्यांनी जागा ताब्यात देणास सुरूवात केली आहे. त्यामुळे रस्त्याचे काम सुरू झाले आहे – अमर शिंदे,कार्यकारी अभियंता-पथ विभाग
वडगाव खुर्द ते सावित्री गार्डन डीपी रस्त्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी केली असून संपूर्ण रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. या रस्त्यामुळे या भागातील वाहतूक कोंडी सुटण्याबरोबरच उद्योग व्यवसायाला चालना मिळणार आहे – निलेश गिरमे,युवासेना शहर प्रमुख,बाळासाहेबांची शिवसेना गट.