पाचगणी: महाबळेश्वरच्या माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व तत्कालीन मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी महाबळेश्वर नगरपालिकेच्या स्वच्छता अभियानात भ्रष्ट्राचार केल्याप्रकरणी युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिन वागदरे यांनी नगरविकास खात्याकडे केलेल्या तक्रारीवरुन माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व तत्कालीन मुख्यधिकारी अमिता दगडे पाटील यांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सातारा यांना देण्यात आले होते .
जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्यातर्फे नगरविकास खात्याला अहवाल पाठवण्यात आला असून निवडणुकीच्या आधीच तत्कालीन मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील व माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार उभी राहिल्याची चर्चा आहे.
दरम्यान वागदरे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये स्वच्छता अभियानामधील करोडो रुपयाच्या निविदामध्ये कोणतीही कायदेशीर पद्धतीचा अंवलंब न करता, तांत्रिक मंजुरी न घेता आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना निविदा दिल्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वच्छता अभियानात नियमबाह्य कामे करुन मनमानी अवास्तव रक्कम लावून बिले काढली आहेत, तसेच कचरा डेपो , रंगरंगोटी , घंटागाडी खरेदी, डस्टबीन खरेदी , कॅमेरा लेन्स खरेदी , स्वच्छता अभियानात जाहिरातीकरीता दिलेले टेंडर घोटाळा, यतिराज बांधकाम कंपनीच्या ठेक्याबाबत, सोशल मिडीया जनजागृतीमध्ये अवास्तव व भरमसाठ बिलाची केलेली वाढ, अशा तक्रारी होत्या.
दरम्यान जिल्हाप्रशासन अधिकारी अभिजीत बापट विविध प्रकारच्या भ्रष्टाचाराचा असल्याचा ठपका चैाकशी अहवालात ठेवल्याचे समजते. याबाबत शिंदे सरकार काय भूमिका घेणार याची उत्सुकता महाबळेश्वर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढली आहे.