अहमदाबाद : ओमिक्रॉनचा उपप्रकार असलेला व्हेरियंट XBB १.५ चा पहिला रुग्ण गुजरातमध्ये सापडला असल्याने कोरोना विरुद्धच्या लढत भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय सार्स कोव-२ जीनोमिक्स कंसोर्टियम (INSACOG) च्या अहवालानुसार डिसेंबरमध्येच हा व्हेरियंट भारतात सापडला आहे.
काही दिवसांपूर्वी भारतात bf ७ व्हेरियंटचे रुग्ण सापडले होते. त्यातच आता XBB1.5 रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागासमोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. याच नव्या व्हेरियंटने न्यूयॉर्कमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
हा व्हेरियंट बीए.२.१०.१ आणि बीए.२.७५ चं म्युटेशन असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हेरियंटने भारतासह ३४ देशाना आपल्या कवेत घेतले आहे. ओमिक्रॉनच्या पठडीतील असल्याने हा व्हेरियंट हा धोकादायक असल्याचे कोरोना तज्ज्ञ सांगत आहेत.
परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग, रॅपिड टेस्टिंग करण्यात येत आहे. कोरोना पॉसिटीव्ह सापडणाऱ्या प्रवाशांचे जेनोमिक सिक्वेन्सिंग करण्यात येत आहे, असे डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले आहे.
सध्या राज्यात २७५ पेक्षा अधिक XBB व्हेरियंटचे रुग्ण आहेत, मात्र XBB १.५ या वेगळ्या प्रकारचा व्हेरियंट असल्याने भारतासाठी चिंता वाढण्याची शक्यता आहे. हा व्हेरीयंट पसरतो कशा प्रकारे, याबाबत सध्याच्या घडीला याबाबत खूप कमी माहिती उपलब्ध आहे.