पिंपरी : पंधराव्या वित्त आयोगांतर्गत राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमअंतर्गत शहरांना हवेच्या दर्जामध्ये सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाकड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरु असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे हवेची गुणवत्ता ढासळली आहे. त्यासाठी या भागात हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी खासगी संस्थेच्या सहकार्यातून एअर प्युरिफिकेश्न यंत्रणा उभारण्यात येणार आहे.
हवा प्रदूषण नियंत्रण क्षेत्रामध्ये हवेची गुणवत्ता सुधारण्याचा दावा; खासगी संस्थेच्या सहकार्यातून उपक्रम सोशल अल्फा ही संस्था पंजूरी लॅबसोबत काम करत आहे. सोशल अल्फा ही सामाजिक संस्था असून ही संस्था हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी यंत्रणा बसवते. या आधी या संस्थेने बंगळुरू व दिल्ली येथे काम केले आहे. जानेवारी महिन्यामध्ये संबंधित संस्थेने पर्यावरण विभागामध्ये सादरीकरण केले आहे.
या सादरीकरणामध्ये त्यांनी महापालिका हद्दीमध्ये एअर प्युरिफिकेश्न यंत्रणा बसवण्यासाठी लागणारा खर्च व ठिकाण याबाबत विचारणा केली. त्यांना पर्यावरण विभागामार्फत सहमती देण्यात आली आहे. सोशल अल्फा, पंजूरी लॅब, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आणि पिंपरी पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हे काम होणार आहे. त्यांसाठी ३३ लाख ५० हजार रुपये खर्च येणार आहे. यासाठी महापालिका २५ टक्के म्हणजेच ८ लाख ५० हजार रुपये खर्च देणार आहे. जानेवारी २०२६ नंतर चालन व देखभाल दुरुस्तीसाठी दरवर्षी २ लाख २५ हजार रुपये खर्च येणार आहे. वाकड, भूमकर चौक पाण्याची टाकी येथील स्थळ यासाठी निश्चित केले आहे. या ठिकाणी मोठ्या इमारतीचे काम सुरू असून प्रदूषण पातळी वाढली आहे. यासाठी ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे.