हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : नोकरीसाठीच शिक्षण असते, असे नव्हे तर त्यात व्यावसायिकता आणि स्वतःमध्ये असलेल्या कलाविष्काराच्या गुणाला व्यापकता मिळते. छोट्या छोट्या गावात आयआयटी सारख्या संस्था कशा निर्माण होतात यांचे मुर्तीमंत उदाहरण हे अभिमन्यू नागवडे असल्याचे प्रतिपादन परम सुपरकॉम्पुटर आणि सी. डॅकचे निर्माते व संस्थापक डॉ. विजय भटकर यांनी केले.
उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बारामती इको सिस्टीम्सच्या बायोगॅस संयत्र तयार होणाऱ्या अभिमन्यू नागवडे यांच्या कंपनीला डॉ. विजय भटकर यांनी भेट दिली यावेळी भटकर बोलत होते.
यावेळी ऍग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण, सकाळ वृत्तपत्राचे उमेश पिंगळे, रामदास नागवडे, बारामती इको सिस्टीमचे अध्यक्ष अभिमन्यू नागवडे, कंपनीचे संचालक गौरव जगताप, हरिश्चंद्र टेमगिरे, तेजल नागवडे, सविता जगताप, पत्रकार अमोल भोसले, आदी मान्यवर उपस्थित होते.
यापुढे बोलताना डॉ. विजय भटकर म्हणाले, “घरातील महिला वर्गांसाठी उपयुक्त पर्याय आणि शेतीसाठी कंपोष्ट खत असा दुहेरी लाभ या बायोगॅसच्या माध्यमातून शेतकऱ्यांना होत आहे. घरगुती गॅसचे वाढलेले दर, कमी झालेली सिलेंडरची संख्या आणि लाकडाच्या धुरापासून होणारे प्रदूषण अशा स्थितीमध्ये पर्यावरणाला पूरक असलेला बायोगॅस शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.”
दरम्यान, प्लॉस्टिक टाकीचा वापर करुन नवीन तंत्राने तयार करण्यात आलेल्या बायोगॅसचे युनिट व त्याचा उपयोग पाहून डॉ. विजय भटकर यांनी समाधान व्यक्त केले. तसेच मला या कंपनीत काम करायला संधी द्याल का असा मिश्कील टोला लगावला यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
ऍग्रोवन चे संपादक आदिनाथ चव्हाण म्हणाले, “पर्यावरणपूरक असलेला बायोगॅस सध्या साऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. बायोगॅस गुरांचे शेण महत्वपूर्ण घटक असून शेतकऱ्यांकडे असलेल्या गुरांमुळे आवश्यक असलेले शेण उपलब्ध होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. विषमुक्त शेतीसाठी या बायोगॅस संयत्र उपयोग होत असून हि चांगली सुरुवात आहे.
बारामती इको सिस्टीमचे अध्यक्ष अभिमन्यू नागवडे म्हणाले, “दर महिण्याला बायोगॅस लाभार्थीची १००० रुपयांची बचत होते. त्यामुळे सेंद्रिय खत निर्मीती व सेंद्रिय शेतीस चालणा मिळते. बायोगॅस बसविल्यामुळे निसर्गातील वृक्षतोडीस आळा बसणार असून पर्यावरणाचा समतोल राखला जातो. ग्रामीण भागातील महिलांचे जीवणमान तसेच आरोग्य सुधारण्यास मदत होणार असून धुरापासुन सुटका होण्यास मदत होते. बायोगॅस सयंत्र पूर्णपणे तयार असल्याने १ तासांत बसिवता येते. बायोगॅस सयंत्र दीर्घकाळ टिकाऊ तसेच कमी जागा लागते. बांधकाम लागत नसल्याने त्याचा खर्च, त्रास व वेळ वाचतो.”