जळगाव : शिवसेना संपविण्याचा आमचा अजिबात अजेंडा नाही, खरी शिवसेना आमच्या सोबत आहे. तुमच्याकडे आता केवळ १० -१२ लोक शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे संपणाऱ्या शिवसेनेचा विचार करा, असा सल्ला भाजप नेते व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना दिला आहे.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे जिल्हाधिकारी कार्यालयात करोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाचा शिवसेना संपविण्याचा अजेंडा असल्याची टीका केली होती. त्यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी खासदार संजय राऊत यांना सल्ला देताना चिमटा काढला. त्याबरोबरीने खासदार संजय राऊत हे सकाळीच घेत असलेल्या पत्रकार परिषदेवर देखील गिरीश महाजन यांनी टीका केली. तसेच सुषमा अंधारे व एकनाथ खडसे यांना देखील गिरीश महाजन यांनी लक्ष केले.
सकाळपासून वायफळ बडबड करण्यापेक्षा संघटनेवर लक्ष द्या, कार्यकर्ते जोडायला सुरुवात करा. त्यातून तुमचा फायदा होईल, असा सल्ला देताना गिरीश महाजन यांनी टोला देखील लगावला.
सुषमा अंधारे यांना कुठलाही बेस नाहीये. त्या कुठे लोकप्रतिनिधी नाहीये. शिवसेनेने त्यांना काहीही बोलत राहा म्हणून पुढे करण्यात आले आहे. ज्यांचे काही स्टेटस नाही त्यांच्याबद्दल काय बोलावे, असे म्हणत महाजन यांनी सुषमा अंधारें यांच्यावर टीका केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरचे आरोप झाले ते फेक स्वरूपाचे आरोप आहेत. अशा फेक आरोपांवर कोणी राजीनामा देत नाही. एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला नव्हता. पक्षाने त्यांचा राजीनामा घेतला होता, असे म्हणत गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना लक्ष्य करत जोरदार टीका केली आहे.