मुंबई : राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व शासकीय स्तरावर उद्या सोमवारी (२६ डिसेंबर) वीर बालदिवस साजरा करावा. असे आदेश महाराष्ट्र शासनाच्या कक्ष अधिकारी मृणाली काटेंगे यांनी परीपत्रकाद्वारे दिले आहेत.
भारत सरकारच्या ९ जानेवारी, २०२२ च्या राजपत्राचे कृपया अवलोकन करावे. दहावे शिखगुरु श्री गुरु गोविंदसिंह यांचे बलिदानीपुत्र श्री जोरावरसिंह आणि श्री. फतेसिंह यांचे ९ वर्ष आणि ६ वर्ष वयाचे असताना शिख संप्रदायाचा सन्मान, अस्मिता हेतू आणि रक्षणार्थ २५ डिसेंबर १७०५ रोजी या दोन वीरपुत्रांनी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या गौरवार्थ २६ डिसेंबर हा दिवस वीर बालदिवस म्हणून साजरा करावा. असे भारत सरकारने निर्देशित केले आहे.
दरम्यान, त्याअनुषंगाने महाराष्ट्र सरकारने देखील या विषयाचे महत्व लक्षात घेऊन समाजातील विविध घटकांमध्ये हा दिवस साजरा करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. त्यासाठी १९ डिसेंबरपासून ते २६ डिसेंबरच्या दरम्यान विविध ठिकाणी वीर बालदिवसाचे कार्यक्रम आयोजित केले जावे.
वीर बालदिवसानिमित्त महाराष्ट्रातील शाळा महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी गुरुपुत्र श्री. जोरावरसिंह आणि श्री. फतेसिंह यांची बलिदानाची गाथा सांगितली जावी. तसेच राज्यातील शाळांमध्ये वीर बालदिवस साजरा करण्याच्या अनुषंगाने आपल्या स्तरावरून राज्यातील सर्व शाळांना अवगत करण्यात यावे. असे पत्राद्वारे कक्ष अधिकारी मृणाली काटेंगे यांनी सांगितले आहे.