अमरावती : चिखलदरा तालुक्यातील आकी गट ग्रामपंचायतीमध्ये थेट निवडणूक असलेल्या सरपंचासह सदस्यांच्या सात जागांवर एकाच कुटुंबातील व्यक्ती निवडून आल्याचा कारनामा घडला आहे. त्यामुळे या निवडणुकीची परिसरात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. यामुळे माजी पोलिस पाटील बाबू जावरकर यांचे कुटुंब या विजयाने चर्चेत आले आहे.
चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत आकी व चौऱ्यामल या दोन गावांसाठी ग्रामपंचायत आहे १,२०५ लोकसंख्या असलेल्या या दोन्ही गावांमध्ये ६०० हून अधिक मतदार आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये सात ग्रामपंचायत सदस्य व सरपंच अशा आठ जागांवर जावरकर कुटुंबातील पाच सदस्य निवडून आले. दोन जागांवर दोन सदस्य निवडून आल्याने शुक्रवारी (ता. २३) त्यांनी नियमानुसार राजीनामा दिला.
सरपंचपदावर सून इंद्रायणी राजेश जावरकर, सदस्य पदासाठी मुलगा माजी सरपंच राजेश जावरकर, पत्नी रुखमा बाबू जावरकर, बहीण बांदाय मावसकर, भाचा रामलाल जांभेकर, नात मीना सेलेकर हे सात जागांवर पाच सदस्य निवडून आले आहेत.
दोन वॉर्डातून विजय अन् जावरकर कुटुंबाने सात सदस्यपदांच्या जागेसाठी पाच सदस्य उभे केले होते. मुलगा राजेश जावरकर व नात मीना सेलेकर है सदस्य दोन जागांवरून निवडून आल्याने प्रत्येकी एका जागेचा राजीनामा त्यांनी शुक्रवारी तहसील कार्यालयात दिला. त्यामुळे रिक्त जागेवर नियमाने सहा महिन्यांच्या आत निवडणूक लागेल.
दरम्यान, मोरगड ग्रामपंचायतीमधून २०१७ साली आकी ग्रामपंचायतीची निर्मिती झाली. प्रथम सरपंच राजेश जावरकर असले तरी मोरगाव ग्रामपंचायतीत उपसरपंच व सरपंचपदावर बाबू जावरकर यांची पत्नी रुखमा जावरकर होत्या. त्यामुळे मागील पंधरा वर्षापासून पद घरातच आहे.