चाकण : वडिलांनी घरी बोलाविले आहे. अशी खोटी बतावणी करून वडिलांच्या मित्राने पाचवीतील विद्यार्थिनीला शाळेतून लॉजवर नेवून बला-त्कार केल्याची धक्कादायक घटना राक्षेवाडी (राजगुरुनगर, ता. खेड) परिसरात घडली आहे. याप्रकरणी खेड पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे.
कल्याण सोनबा राक्षे (वय ४२ रा. राक्षेवाडी, ता खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे वडील व आरोपी हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. तसेच आरोपीचे पीडित मुलीच्या घरी नेहमी येणे जाणे होते. तर पिडीत मुलगी ही जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवीच्या वर्गात शिकत आहे.
दरम्यान, आरोपी एके दिवशी पिडीत मुलीच्या शाळेत आला. आणि पिडीत मुलीला म्हणाला, तुला वडिलांनी बोलाविले आहे. अशी खोटी बतावणी करून आरोपीने मुलीला शाळेतून लॉजवर नेऊन अत्याचार केला. आणि त्यानंतर मुलीला पुन्हा शाळेत आणून सोडले.
त्यानंतर मुलीने घरी गेल्यानंतर घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. मुलीच्या आईने त्वरित खेड पोलीस ठाणे गाठले. आणि आरोपीच्या विरोधात पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता. २३) तक्रार दिली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.