मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना शुक्रवारी (२३ डिसेंबर) सीबीआयच्या मुख्यालयात बोलावण्यात आले होते. चौकशी केल्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली. दोघेही उत्तरे देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप सीबीआयने केला.
अटक केल्यानंतर सीबीआय अधिकाऱ्यांचे एक पथकांने शनिवारी (२४ डिसेंबर) सकाळी दोघांना दिल्लीहून मुंबईला विमानाने आणण्यात आले. त्यानंतर त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या चौकशीसाठी कोठडीची मागणी केली असता न्यायालयाने कोचर दांपत्याला तीन दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे.
व्हिडिओकॉन कर्ज गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई करण्यात आली आहे. तपास यंत्रणेने शुक्रवारी (२३ डिसेंबर) संध्याकाळी आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली. चंदा कोचर आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख असताना त्यांनी व्हिडिओकॉन समूहाला कर्ज दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या बदल्यात चंदा यांचे पती दीपक कोचर यांच्या नु रिन्युएबल कंपनीला व्हिडिओकॉनकडून गुंतवणूक मिळाली.