ढाका : येथे सुरु असलेली भारत व बांगलादेश दरम्यानची कसोटी लढत एकदम रंगतदार अवस्थेत आली आहे. भारताला विजयासाठी केवळ १०० धावांची तर बांगलादेश संघाला केवळ ६ गडी बाद करण्याची आवश्यकता आहे. आज दिवसअखेर भारतीय संघाने ४ बाद ४५ धावा केल्या आहेत.
ढाका येथील शेर ए बंगला मैदानावर भारत व बांगलादेश यांच्या दरम्यान दुसरी कसोटी लढत सुरु आहे. या लढतीत कालच्या दुसऱ्या डावात बिनबाद ७ पासून बांगलादेश संघाने खेळाला सुरुवात केली. अक्षर पटेल, मोहम्मद सिराज व आर अश्विन यांच्या गोलंदाजी समोर बांगलादेश संघाला मोठी धावसंख्या उभाराता आली नाही.
बांगलादेश संघाने दुसऱ्या डावात सर्वबाद २३१ धावा केल्या. दुसऱ्या डावात लिटन दासने ७३ (९८ चेंडू, ७ चौकार) व झाकीर हसनने ५१ (१३५ चेंडू, ५ चौकार) धावांची खेळी केली. हे दोघे वगळता बांगलादेश संघाच्या कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आला नाही. अक्षर पटेलने ३, मोहम्मद सिराज व आर. अश्र्विनने प्रत्येकी २ तर उमेश यादव व जयदेव उडाणकटने प्रत्येकी १ गडी बाद केला.
भारताने पहिल्या डावात ३१४ धावा केल्या होत्या. बांगलादेश संघाने पहिल्या डावात २२७ व दुसऱ्या डावात २३१ धावा केल्या आहेत. भारतासमोर १४४ धावांचे आव्हान आहे. भारताने दुसऱ्या डावाला सुरुवात केली असून भारतीय सलामीवीरांनी पुन्हा एकदा निराशा केली आहे.
सलामीवीर शुभमन गिल ७, कर्णधार के. एल. राहुल २, विराट कोहली १ तर चेतेश्वर पुजारा ६ धावा करून दुसऱ्या डावात बाद झाले आहेत. सध्याच्या घडीला अक्षर पटेल २६ (३ चौकार) व जयदेव उडानकट ३ धावांवर खेळत आहेत. बांगलादेश संघाच्या मेहदी हसन मिराजने ३ तर कर्णधार शाकिब अल हसनने एक गडी बाद केला आहे.
लढतीचे अजून दोन दिवस शिल्लक आहेत. चौथ्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी १०० धावांची आवश्यकता आहे. भारताकडे रिषभ पंत, श्रेयस अय्यर हे फलंदाज अजून शिल्लक आहेत. आर. अश्विन देखील फलंदाजी करण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे केवळ १०० धावा भारतीय फलंदाज आरामशीर करू शकतील अशी क्रीडाप्रेमींना अपेक्षा आहे.