दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर तालुक्यात निवडणूक झालेल्या २६ पैकी १९ ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळविले असून निवडणूकीच्या निकालातून भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली भाजपचे इंदापूर तालुक्यावरील निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया भाजप इंदापूर तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार यांनी ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर मंगळवारी (दि.२०) दिली.
इंदापूर तालुक्यात भाजपला ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जनतेने स्पष्टपणे कौल दिला आहे. इंदापूरच्या लोकप्रतिनिधीच्या विरोधात जनतेने मतपेटीतून दिलेला हा स्पष्ट कौल असल्याचे अॅड.जामदार यांनी सांगितले. आगामी काळात भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार जाणार नाही, असे त्यांनी नमूद केले.
या निवडणुकीमध्ये सुमारे ७५ टक्के ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. तसेच या निवडणुकीत विरोधकांकडे असलेल्या अनेक ग्रामपंचायती भाजपने ताब्यात घेतल्या आहेत. भाजपचे गावोगावचे प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक यांनी ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपच्या विजयासाठी अहोरात्र परिश्रम घेतल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळातील सर्वच निवडणुका जिंकून भाजप आपली ताकद दाखवून देईल, असे तालुकाध्यक्ष अॅड.शरद जामदार यांनी स्पष्टपणे सांगितले.
भाजपने वर्चस्व मिळविलेल्या ग्रामपंचायतीं पुढीलप्रमाणे
पडस्थळ, अजोती-सुगाव, डाळज नं.१, जांब, मानकरवाडी, डाळज नं.२, गंगावळण, थोरातवाडी, डाळज नं.३, हिंगणगाव, सराटी, बेलवाडी, बिजवडी, रेडणी, पिंपरी खुर्द-शिरसोडी, म्हसोबावाडी, कुरवली, लाखेवाडी व बोरी.