चाकण : पोक्सो कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्हयामध्ये आरोपी न करण्यासाठी तब्बल १० हजाराची लाच मागितल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यातील कर्माचाऱ्यासह एकावर चाकण पोलीस ठाण्यात सोमवारी (ता.१९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष सुरेश पंदरकर (पोलीस शिपाई, नेमणुक पाईट दरक्षेत्र, चाकण पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय) आणि खाजगी इसम किसन आंद्रे (रा. पाळू पाईटगांव ता. खेड, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका ३२ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना पोक्सो कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्हयामध्ये आरोपी न करण्यासाठी आरोपी पोलीस कर्मचारी संतोष पंदरकर यांनी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता लोकसेवक पोलीस शिपाई पंदरकर व खाजगी इसम किसन आंद्रे यानी १० हजार रूपयांची लाचेची मागणी केली असल्याचे आढळून आले. त्यानंतर पंदरकर व खाजगी इसम आंद्रे यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करत हेत.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.