पुणे : मामा आणि भाच्याचे नाते हे पवित्र असते. मात्र सख्खा भाचा पक्का वैरी असल्याची धक्कादायक घटना पुण्यातील राजेवाडी परिसरात घडली आहे. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने टेम्पो कामावरून काढून टाकण्यास जबाबदार असल्याच्या संशयावरून भाच्याने मामाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केल्याची घटना रविवारी (ता.१८) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात मामा गंभीर जखमी झाला आहे. तर भाच्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रविण देवदास जगधने (रा. राजेवाडी, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भाच्याचे नाव आहे. याप्रकरणी मामा अभिषण दादु रणदिवे (38, रा. नानापेठ, राजेवाडी) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीणने त्यांच्याकडील टेम्पो पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतुक विभागासाठी भाडेतत्वावर दिला होता. दोन महिन्यांपूर्वी त्याने महानगर पालिकेची पावती स्वतःच्या नावावर गुगल पे द्वारे घेतली होती. त्यामुळे प्रशासनाने त्याचा टेम्पो करारातून वगळला.
दरम्यान, या घटनेला मामा रणदिवे हे कारणीभूत असल्याच्या संशयातून प्रवीणने अभिषणवर कुऱ्हाडीने वार करून खुनाचा प्रयत्न केला. आणि मी इथला भाई आहे असे मोठ्याने ओरडुन कुऱ्हाड हवेत फिरवून दहशत पसरवली.
याप्रकरणी अभिषण रणदिवे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी प्रविण जगधने याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास समर्थ पोलीस करीत आहेत.