नागपूर : आजपासून सुरु झालेल्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ हे राज्य सरकारला घेण्याच्या तयारीत असताना ठाकरे गटाच्या आमदार सुनील प्रभू यांनी देखील संधी मिळताच प्रश्नांची साबरबत्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेल्या गुगलीवर सुनील प्रभू क्लीन बोल्ड झाले.
अजित पवार राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी राज्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या रंगरंगोटीवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला मात्र, फडणवीस यांनी दिलेल्या उत्तराने त्यांच्या प्रश्नातील हवाच निघून गेल्याने विधिमंडळात चांगलाच हशा पिकाला.
ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. विद्यमान स्थितीत राज्य सरकारमध्ये एकही राज्यमंत्री नसताना नागपूर अधिवेशनात राज्यमंत्र्यांचे सगळे बंगले सजवले गेलेले आहे. ज्या बंगल्याची आत्ता आवश्यकता नाही. एकाबाजूला सरकार प्रकल्पांवर करोडो रुपये खर्च करत आहे. त्यासाठी शासन कर्ज काढते आहे. मग ज्या बंगल्याची आवश्यकताच नाही, त्यावर लाखो रुपये खर्च करण्याची आवश्यकता काय? असा सवाल उपस्थित करुन सुनील प्रभू यांना सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.
सुरेश प्रभू यांच्या प्रश्न संपताच देवेंद्र फडणवीस यांनी ‘सार्वजनिक बांधकाम विभागाला कुठे माहितीये की सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार आहे ? तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. आम्ही अधिवेशन सुरु असतानाही मंत्रिमंडळाचा विस्तार करु शकतो. प्रश्न राहिला मंत्र्यांच्या बंगल्यांच्या रंगरंगोटीचा. तर प्रत्येक अधिवेशनात अशी रंगरंगोटी होत असते आणि त्याचा खर्च लाखो-करोडो वगैरे नसतो. पाहिजे तर आपल्याला खर्चाचा हिशेब पाठवतो” म्हणत फडणवीसांनी सुनील प्रभूंचा प्रश्न निकाली काढला.
दरम्यान लवकर ‘मंत्रिमंडळाचा विस्तार करा’ असा चिमटा सुनील प्रभू यांनी फडणवीसांचं निवेदन सुरु असताना काढला. त्यावर ‘तुम्हाला व्हायचं आहे का मंत्री, पाहिजे का संधी? असं हजरजबाबी प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं अन् सभगृहात एकच हशा पिकला.