पुणे : पुणे बंदला विरोध करणाऱ्या व्यवसायिकेच्या विरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध समाज माध्यमांवर टीका केल्याप्रकरणी व्यवसायिक महिलेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी राज्यपाल यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पुणे बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी दुकान बंद न करणाऱ्या एका व्यावसायिक महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याच व्यवसायिक महिलेने शरद पवारांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अनघा घैसास यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश काकडे यांच्याकडून ही तक्रार दाखल करण्यात आली असून घैसास यांच्या लिखाणात वापरण्यात आलेली भाषा असभ्य असून त्यांनी कायद्याच्या अनेक तरतुदींचा भंग केल्याचे या तक्रारीत म्हंटले आहे.
दरम्यान अनघा घैसास यांच्यावर तक्रार दाखल झाल्यांनतर त्यांनी फेसबुक पोस्ट करत या तक्रारीविषयी प्रतिक्रिया दिली की, ‘तुमची ताकद वापरून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे, हा मुळात अत्यंत घृणास्पद आहे. माझी केतकी चितळे करण्याचा बेत आहे का, असा प्रश्न घैसास यांनी विचारला आहे.