अजित जगताप
सातारा : सातारा जिल्ह्यातील शहरानजिक कोडोली येथे ब्रिटिश काळापासून ख्रिस्ती दफनभूमी आहे. या जागेबाबत ख्रिस्ती बांधवांमध्ये श्रद्धा आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून बहाई समाजातील काही लोकांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशानुसार या ठिकाणी बहाई दफनभूमी फलक व तार कुंपण केल्यामुळे ख्रिस्ती समाजात असंतोष पसरला आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक व सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, या दफनभूमीत ख्रिस्ती समाजाचे विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. सदर ख्रिस्ती बांधवांच्या दफनभूमीची सुविधा ही वाई, सातारा,महाबळेश्वर या ठिकाणी आहे तर उर्वरित कोरेगाव, कराड, खटाव, माण, खंडाळा पाटण या ठिकाणी ख्रिस्ती दफनभूमी नसल्याने ख्रिस्ती बांधवांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंतिम विधी करण्यासाठी वाई ,सातारा व महाबळेश्वर या ठिकाणी नातेवाईक, हितचिंतक, आप्तेष्ट व मित्रपरिवार यांना धार्मिक विधिसाठी यावे लागते. त्यापैकी कोडोली येथील ख्रिस्ती दफन भूमीची जागा दि.१४ जुलै २०१४ च्या सातारा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बहाई समाजाला दिल्याचे आदेश उघडकीस आले आहेत.
ख्रिस्ती समाजातील मोहन कांबळे यांचा दफनविधी १९९३ साली याच दफनभूमीत करण्यात आला होता. त्यांची मुलगी मयुरा गायकवाड या दफनभूमीत गेल्या असता, त्यांना हा प्रकार लक्षात आला. यावेळी बहाई समाजाने दफनभूमीचा फलक व तारांचे कुंपण लावल्याचे त्यांना आढळून आले. यावर त्यांनी समाजामध्ये जनजागृती करताना जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याबाबत निवेदन दिले.
तसेच अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष परीक्षित खुडे, युवक जिल्हाध्यक्ष आशिष खुडे व सहाय्यक सचिव मनोज कांबळे यांनी सातारा येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांना सादर जागा हस्तांतरीत करणारा आदेश रद्द करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तसेच सातारा जिल्हा प्रशासनाने बहाई समाजाला इतरत्र जागा द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.