पुणे : फ्लॅट विकत देण्याचे आमिष दाखवून आठ जणांना तब्बल ५२ लाखाचा गंडा घालून ४ वर्षापासून चकवा देणाऱ्या एका भामट्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने दिघी प्राधिकरणाच्या परिसरात सापळा रचून अटक केली आहे.
महेश बापू लोंढे (वय-४२, रा. गुरव पिंपरी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या नाव आहे.
गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हरीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश लोंढे याने मिरॅकल ९, वडमुखवाडी या ठिकाणी फ्लॅटची विक्री करीत असल्याची खोटी बतावणी नागरिकांना केली व आरोपीने खोटे आमिष दाखवून आठ जणांकडून ५२ लाख ७३ हजार ४३४ रुपये घेतले. त्यानंतर पैसे किंवा फ्लॅट न देता फसवणूक करून आरोपी पसार झाला होता. या प्रकरणी दिघी आणि भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर आरोपी हा २०१८ पासून फरार असून वेगवेगळ्या ठिकाणी ओळख बदलून राहत होता.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाला तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी लोंढे हा मोशी प्राधिकरण परिसरात असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीला पुढील कारवाईसाठी दिघी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.