पुणे : राज्यात निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असून १८ डिसेंबरला थेट सरपंचपदी कुणाची वर्णी लागणार यासाठी उमेदवारांचे भविष्य ठरणार आहे. तर २० तारखेला कोणता उमेदवार गावाचा ‘कारभारी’ होणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे. तत्पूर्वी, आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच उमेदवार आपल्या परीने मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करणार आहेत.
मागील पंचवार्षिक प्रमाणे यावर्षी देखील थेट गावातूनच सरपंच निवडण्यात येणार आहे. त्यामुळे आज प्रत्येकच जण ‘सरपंचपद’ आपल्यालाच मिळावे यासाठी झगडताना दिसून येत आहे. यामुळे ही निवडणुकीत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने प्रचार परवानगी संध्याकाळी ५ वाजता संपुष्टात येणार असून रविवारी (दि. १८) मतदान होणार आहे.
दरम्यान, राज्यातील ७६८२ गावे आपला ‘कारभारी’ ठरवणार आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना आपणच कसे या पदासाठी योग्य आहोत, हे पटवून देण्यासाठी प्रत्येकच उमेदवारांनी आपली ताकद लावली आहे. यामुळेच ही निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
प्रत्येक गावात समीकरणे वेग-वेगळी
ग्रामपंचायत निवडणूक ही बाकी निवडणुकीपेक्षा वेगळी ठरते. बाकी निवडणुकांमध्ये थेट राजकीय पक्ष एकमेकांना भिडतात. मात्र, ग्रामपंचायत निवडणूक ही पॅनल टू पॅनल निवडणूक असते. पॅनलची एकत्रित ताकद किती यावर कोणते पॅनल बाजी मारणार याचे गणित बसविलेले असते.
कधी कधी सरपंच एका पक्षाचा व उपसरपंच किंवा बाकी ग्रामपंचायत सदस्य दुसऱ्या पक्षाचे देखील असू शकतात. त्यामुळे गाव पातळीवर किंवा स्थानिक पातळीवर सक्षम असणारे उमेदवाराच गावाचा रहाटगाडा ओढताना दिसून येतात.