पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील सदनिकांसाठीची संगणकीय सोडत आज गुरुवारी (ता.१५) काढण्यात आली आहे. आणि यामध्ये ४८१ नागरिकांना लाभ मिळाला आहे. अशी माहिती प्राधिकरणाचे सह आयुक्त
बन्सी गवळी यांनी दिली आहे.
या संगणकीय सोडतीची प्रक्रिया महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल रंजन महिवाल यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली पार पडली. सदर सोडत ही लाभार्थी कोमल जनार्धन वंजारे, प्रदिप शिवाजी वेताळ, कोमल राजेंद कातुरे यांच्या हस्ते काढण्यात आली आहे.
भोसरी येथील सेक्टर क्र.१२ मधील ८२४ व वाल्हेकरवाडी सेक्टर क्र. ३०-३२ मधील ७८० सदनिका अशी एकूण १६०४ सदनिकांची आज सोडत होती. या प्रक्रियेत एकूण ७७० अर्ज आले होते. यातील ४८१ लाभार्थी यामध्ये विजयी झाले आहेत. यांमध्ये भोसरी येथील सेक्टर क्र १२ मध्ये आर्थिक दुर्बल घटकातील ३१ आणि लघु उत्पन्न घटकातील २६० नागरिकांना लाभ मिळाला आहे. तर वाल्हेकरवाडी सेक्टर क्र. ३०-३२ मध्ये आर्थिक दुर्बल घटकातील ३७ व लघु उत्पन्न घटकातील १५३ नागरिकांना लाभ मिळाला आहे. सर्व विजेत्यांची नावे पोर्टलवर आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वेबसाइटवर प्रसिध्द करण्यात आली आहे. तर भोसरी येथील EWS साठी प्रतिक्षा यादी काढण्यात आली आहे.
दरम्यान, विजेत्या लाथार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी २६ डिसेंबर २०२२ पासुन सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक सुचनापत्र दि २० डिसेंबर २०२२ पर्यंत वैयक्तिक ई-मेलवर पाठविण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांना १० जानेवारी २०२३ पुर्वी अंतिम वाटपपत्र देण्यात येवून सदनिकेची उर्वरीत विहित रक्कम भरण्यासाठी ३१ जानेवारी २०२३ पर्यंतची मुदत देण्यात येणार आहे. सर्व रक्कम अदा केले नंतर सदनिकांचा नोंदणी करून ताबा देण्यात येणार आहे.
या सोडतीसाठी सनियंत्रण समितीचे सदस्य एम.एम.पोतदार, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश धनंजय कुलकर्णी सेवानिवृत्त जिल्हा सूचना अधिकारी पुणे, सह आयुक्त बन्सी गवळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुंभार, उप जिल्हाधिकारी तथा जनसंपर्क अधिकारी रामदास जगताप, आणि म्हाडा विकसीत संगणक प्रणालीचे काम पाहणारे प्रोबिटी सॉफ्ट लि.चे कार्यकारी संचालक निलेश डोईफोडे व त्यांची टिम यावेळी उपस्थित होती.