दीपक खिलारे
इंदापूर : शहरात मंगळवारी (ता. १३) रोजी पुकारण्यात आलेल्या इंदापूर बंदचा कालावधी हा दुपारी बारा वाजेपर्यंतच ठेवण्यात आला होता. यामुळे व्यापारी वर्ग समाधानी होता. यापुढेही राजकीय पक्ष, संघटना यांनी शहरातील व्यापारी, व्यावसायिक संघटनांना विश्वासात घेऊन बंदचा निर्णय घ्यावा अशी मागणी रचना बझार व्यापारी ट्रस्टचे अध्यक्ष अमर लेंडवे व सचिव संदीप खुटाळे यांनी केली आहे.
यावेळी बोलताना अमर लेंडवे म्हणाले की, आजपर्यंत शहरात पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये रचना व्यापारी ट्रस्टचे सर्व व्यापारी गाळेधारक उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवितात.
ते पुढे म्हणाले की, इंदापूर ही मोठी बाजारपेठ असून याठिकाणी इंदापूर ग्रामीण भाग, माढा व करमाळा तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने इंदापूर शहरात येत असतात. तसेच शहरातील हातावर पोट असणाऱ्या लहान-मोठ्या व्यावसायिक धारक यांचाही विचार आणि त्यांना विश्वासात घेऊन सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी बंदबाबत निर्णय घ्यावा असेही रचना बझार व्यापारी ट्रस्टचे अध्यक्ष अमर लेंडवे यांनी सांगितले.