पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी वादग्रस्त विधान केले होते. या यानंतर राज्यात अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली. याच पार्श्वभूमीवर आज मंगळवारी पुणे बंदची हाक देण्यात आली आहे.
पुण्यात आज मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा सकाळी ९ वाजता छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथून टिळक चौकातून लक्ष्मी रोडने उलट मार्गे बेलबाह चौका-डावीकडे वळून शिवाजीरोडने उलट मार्गे जिजामात चौक, लाल महल इथे समाप्त होणार आहे. यामुळे या कालावधीत डेक्कन, विश्रामबाग, फरासखाना वाहतूक विभागाच्या हद्दीतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीमध्ये बदल केले जात आहेत
दरम्यान, पुणे बंदमुळे पुण्यात काय सुरू राहणार आणि काय बंद असणार. तसेच वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्याची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे
काय बंद आणि काय चालू राहणार?
पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी जीवनावश्यक वस्तूंच्या श्रेणीत येत असल्याने पुणे जिल्ह्यातील इंधन पंप उद्याही सुरू राहणार आहेत. पेट्रोल पंप मालकांनी पोलिसांना पत्र लिहून संरक्षणाची मागणी केली आहे. अहवालानुसार, किराणा, बेकरी आणि दुग्धजन्य पदार्थांची दुकाने यासारख्या अत्यावश्यक सेवा उद्या सकाळी १० वाजेपर्यंत सुरू राहतील आणि नंतर दुपारी ३ वाजेपर्यंत बंद पाळतील. बंद दरम्यान वैद्यकीय दुकाने सुरू राहणार आहेत. तर पुणे बंदला पाठिंबा देण्यासाठी उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत दुकाने, बाजारपेठा बंद राहणार आहेत.
वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे
१)लक्ष्मी रोड – सोन्या मारूती चौक ते अलका टॉकीज चौक (मोर्चा सुरू झाल्यापासून बेलबाग चौक पास होईपर्यंत)
२) शिवाजी रोड – स.गो. बर्वे चौक ( मोर्चा सेवासदन चौक पास झाल्यानंतर मोर्चा संपेपर्यंत)
३)बाजीराव रोड – पुरम चौक ते आप्पा बळवंत चौक (मोर्चा सेवासदन चौक पास होईपर्यंत आवश्यकतेनुसार)
४)गणेश रोड – फकडे हौद चौक ते जिजामाता चौक (मोर्चा सेवासदन चौक पास होईपर्यंत आवश्यकतेनुसार)
५)केळकर रोड – आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक (मोर्चा बुधावर चौकातून पास होईपर्यंत)
पर्यायी मार्ग –
मोर्चाच्या कालावधीत वरील मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात येत असल्याने वाहन चालकांनी टिळक रोड, केळकर रोड आणि कुमठेकर रोडचा वापर करून इच्छितस्थळी जावे, असे सांगण्यात आले आहे.