लोणी काळभोर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून हातभट्टीची दारू विक्री करण्यासाठी जाणाऱ्या एकाला लोणी काळभोर पोलिसांनी पकडले आहे. ही कारवाई पोलिसांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल एसफोरजीच्या समोरून मंगळवारी (ता.14) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास केली आहे. या कारवाईत पोलिसांना 47 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे.
मयूर भीमराव लोंढे (वय – 28 रा. पांढरस्थळ उरुळी कांचन, ता. हवेली) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर याप्रकरणी प्रदीप गाडे (वय – 42) यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप गाडे हे पोलीस अंमलदार असून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. पोलिसांना पुणे सोलापूर महामार्गावरून अवैध हातभट्टी दारूची वाहतूक होणार आहे. अशी माहिती एका खबऱ्या मार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी हॉटेल एसफोरजी च्या समोर सापळा रचून एका संशयित दुचाकीस्वाराला ताब्यात घेतले.
दरम्यान, दुचाकीस्वराच्या दुचाकीची तपासणी केली असता, त्याच्या दुचाकीवरील दोन कॅनमध्ये 70 लिटर हातभट्टी दारू आढळून आली. पोलिसांनी या कारवाईत 7 हजार रुपयांची दारू व दुचाकी असा 47 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर याप्रकरणी मयूर लोंढे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार विलास शिंदे व प्रदीप गाडे यांच्या पथकाने केली आहे.