पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील डेअरी फार्म येथे लोहमार्गावर उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. रेल्वेमार्गावरील स्ट्रक्चरचा आराखडा पुण्यातील सीओईपी (तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे) यांच्यामार्फत तपासून घेतला जाणार आहे. त्यांच्या मंजुरीनंतर त्या कामास सुरुवात करता येणार आहे.
पुणे-मुंबई जुना महामार्ग व पिंपरी गावास जोडण्यासाठी मिलिटरी डेअरी फार्म येथे लोहमार्गावर उड्डाण पूल बांधण्याचे काम सुरू आहे. रस्ता, पुलाचे जोड आदींचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. लोहमार्गावरील पुलाच्या संबंधित ठेकेदाराने स्ट्रक्चर डिझाईन व ड्रॉईंग तयार केले आहे. ते डिझाईन व ड्रॉईंग रेल्वे विभागातर्फे मान्यता प्राप्त संस्थेकडून तपासून घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार महापालिकेकडून ते डिझाईन व ड्रॉईंग पुण्यातील सीओईपीकडून तपासून घेण्यात येणार आहे.
त्या कामासाठी एकूण ५ लाख ६६ हजार ४०० रूपये शुल्क आहे. सीओईपीकडून सकारात्मक तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर रेल्वे विभागाकडून अंतिम मंजुरी घेऊन लोहमार्गावरील पुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले