लोणी काळभोर: हवेली तालुका प्रिंट व डिजिटल मिडीया पत्रकार संघ व समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय लोणी काळभोर यांच्या संयुक्त विद्यमाने सव्वा लाख रुपये रोख पारितोषिक असलेली ‘समाजभूषण’ आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आयोजक प्रिंट व डिजिटल मिडीया पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संदीप बोडके व समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर यांनी दिली.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात 1 फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजता या स्पर्धेचे उदघाटन होणार असून ठीक दहा वाजता वक्तृत्व स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेचे यंदाचे हे पहिलेच वर्ष आहे. या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 51 हजार रुपये रोख रक्कम, प्रमाणपत्र व चषक, द्वितीय बक्षीस 35 हजार रुपये रोख रक्कम, प्रमाणपत्र व चषक, तर तृतीय बक्षीस हे 25 हजार रुपये रोख रक्कम, प्रमाणपत्र व चषक देण्यात येणार आहे. तसेच दोन उत्तेजनार्थ स्पर्धकांना 11 हजार रुपये रोख रक्कम, प्रमाणपत्र व चषक देण्यात येणार आहे. हि स्पर्धा शनिवारी ता. 01 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. तर पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (ता. 02 फेब्रुवारी) दुपारी दोन वाजता संपन्न होणार आहे.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना “सोशल मिडीया आणि आजचा युवक,” “अहिल्याबाई होळकर-महिला कल्याण व सुशासन,” “शिक्षणातील दीपस्तंभ- शिक्षणमहर्षी डॉ. बापुजी साळुंके,” “अभिजात मराठी- भवितव्य आणि जबाबदारी,” आणि “माझ्या कल्पनेतील समृद्ध महाराष्ट्र” यापैकी एका विषयावर 6 अधिक 2 अशा 8 मिनिटांत बोलावे लागेल. वेळेचे बंधन अनिवार्य आहे.
या स्पर्धेतील स्पर्धकांनी आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे पत्र व स्वतःचे ओळखपत्र स्पर्धेला येताना सोबत घेऊन येणे बंधनकारक आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर विभागात शिकणारा विद्यार्थी/विद्यार्थिनी स्पर्धक म्हणून या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. एका महाविद्यालयातील फक्त दोनच विद्यार्थी अथवा विद्यार्थीनीला सहभाग नोंदवता येईल. प्रवास खर्च संबंधित महाविद्यालयाने करायचा आहे. स्पर्धा मराठी भाषेतून घेण्यात येणार आहे. तसेच बाहेर गावातील स्पर्धकांसाठी राहण्याची व भोजनाची व्यवस्था महाविद्यालयात करण्यात आली आहे.
दरम्यान, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी डॉ. विजयकुमार घोडके – 9923884867, प्रा. सतीश कुदळे, 9923577072, सौ. नीलिमा हेमाडे 9077836104, यांच्याशी संपर्क साधून स्पर्धेची माहिती व नियम याविषयी जाणून घ्यावे. नाव नोंदणीसाठी दिनांक 25 जानेवारी अंतिम मुदत आहे. नावनोंदणी ऑनलाईन करावी. या स्पर्धेचे संयोजन प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू काळभोर, तालुकाध्यक्ष संदीप बोडके, समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर यांनी केले आहे.
याबाबत बोलताना प्रिंट व डिजिटल मिडीया पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू काळभोर म्हणाले, “महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांचा सभा धीटपणा वाढावा, मर्यादित वेळेत मुद्देसूद बोलता यावे, आपला मुद्दा समोरच्या व्यक्तीला पटवून देण्याचे कौशल्य प्राप्त व्हावे, विद्यार्थ्यांच्यात वाचन संस्कृती वाढून चिकित्सक वृत्ती तयार व्हावी म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घ्यावा. इतरांनी ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित रहावे.”