पिंपरी: स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या कारभारात ई-टपाल, डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टमद्वारे कागदपत्रांचे व्यवस्थापन करणारी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या १५ जानेवारीपासून सर्व विभागांत ई-ऑफिस प्रणाली सुरू केली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेतील सर्व शासकीय अभिलेख व दस्तऐवज हा इलेक्ट्रॉनिक (संगणकीय) स्वरूपात जतन होणार आहेत. त्यामुळे पेपरलेस कारभार आणि प्रशासन गतीमान होण्यास मदत होईल, असा प्रशासनाचा दावा आहे
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीकडून जीआयएस सक्षम ईआरपी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या प्रकल्पावर सुमारे ८३ कोटी रुपये खर्च केला आहे. या प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या ३५ विभागाचे दैनंदिन कामकाज ई ऑफीस प्रणालीत सुरु क्ररण्यात येत आहे. या प्रणालीने पालिकेचे सर्व विभागाचे कामकाज ऑनलाईन सुरु होत आहे.
स्मार्ट सिटी आणि महापालिकेकडून जीआयएस सक्षम ईआरपी प्रकल्पाद्वारे ३३ मॉडयूल तयार केले असून त्याद्वारे प्रशासनात ई-ऑफीस प्रणालीत कामकाज होणार आहे. या जीआयएस सक्षम ईआरपी प्रणालीत महापालिकेच्या संबंधित विभागातील अधिकारी कर्मचारी यांना आपल्या विभागातील सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध होत आहे. महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये जीएसआय सक्षम ईआरपी प्रणालीचा वापर सुरू केल्याने कामकाजाला गती येत आहे. शिवाय कामकाज संपूर्णपणे कागद विरहित (पेपरलेस) होत असल्याने अधिक सुलभता येऊ लागली आहे.
पालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये जीएसआय सक्षम ईआरपी ऑनलाइन’ प्रणाली सुरू करण्यात येत आहे. सर्व कार्यालये ऑनलाईन झाल्यास कामकाजाच्या फाइल्स, कागदपत्रे ऑनलाईन पाहता येतील, त्यामुळे कागदविरहित (पेपरलेस) सर्व फाईल्सला देखील मान्यता देता येणार आहे.
नवीन प्रणालीची अंमलबजावणी करताना ती कार्यप्रणाली समजून घेण्याच्या उद्दीष्टाने सुरुवातीला अधिकारी व कर्मचान्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये कामाचे व्यवस्थापन करणारी प्रणालीचे (डीएमएस) प्रशिक्षण देण्यात आले. डीएमएस प्रणालीमध्ये नस्त्या तयार करताना प्रत्यक्ष तांत्रिक अडचणी, त्रुटी असल्यास तसे निरिक्षण विभाग प्रमुखांनी लेखी स्वरूपात प्रशासन विभागास कळविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. विभाग प्रमुखांनी नोंदविलेल्या निरीक्षणाची पूर्तता मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी यांच्यामार्फत होणार आहे.
नागरिकांना प्रभावीपणे सेवा देण्यास मदत आयुक्त
स्मार्ट सिटी लिमिटेडअंतर्गत सुरू असलेल्या जीआयएस सक्षम ईआरपी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. महापालिका विभागांना जोडणारा ‘जीआयएस सक्षम एकात्मिक ईआरपी’ हा देशातील एकमेव प्रकल्प आहे. ज्या ठिकाणी महापालिकेचे सर्व विभाग भौगोलिक माहिती प्रणालीसोबत इंटरप्रायजेस रिसोर्सेस प्लॅनिंगद्वारे एकत्रित केले आहेत. तसेच, नागरिकांना कार्यक्षम आणि प्रभावीपणे सेवा प्रदान करण्यास मदत होणार आहे, असे महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी म्हटले आहे.