पुणे : राज्यामध्ये थंडी चा जोर चांगलाच वाढला आहे. तापमानात कमालीची घट झाल्यामुळे गारठा वाढला आहे. एकीकडे थंडी तर आता दुसरीकडे राज्यात पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. सध्या धुळ्यामध्ये सर्वात कमी म्हणजे ४.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरपेक्षा धुळे, जळगाव आणि विदर्भ जास्त थंड झाले आहे.
उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे महाराष्ट्रात हुडहुडी भरली आहे. अनेक ठिकाणी पारा आहे १० अंशांखाली गेलेला बघायला मिळत आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात ४.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. थंडी वाढत असतानाच राज्यात पावसाला पोषक वातावरणही तयार होत आहे. त्यामुळे आज उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वाहत आहेत. पश्चिमी चक्रवातामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली असून, दाट धुक्याचे साम्राज्य दिसू लागले आहे. गुरुवारी पंजाबच्या आदमपूरमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. राज्यात थंडी वाढल्याने गुरुवारी धुळ्यासह मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, जळगाव, नाशिक, तर मराठवाड्यातील परभणी कृषी विद्यापीठ आणि विदर्भातील नागपूर, गोंदिया, ब्रह्मपुरी, वर्धा आणि भंडारा येथे किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे.
सकाळपर्यंच्या २४ तासांत रत्नागिरी येथे ३३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.आज राज्याच्या किमान तापमानात काहीशी वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असला तरी देखील गारठा कायम राहण्याचा अंदाज आहे. यातच उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.