सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत. वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. अनेक ठिकाणी दुपारी कडक उन्ह जाणवतंय. असे जरी असले तरी यापासून काळजी घेण्याचे आव्हान समोर उभे राहते. सध्या ताप, घसा खवखवणे, सर्दी, खोकला, कफ यांसारख्या तक्रारी घेऊन दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे.
सध्या न्यूमोनिया या आजाराचे रुग्णही आढळत आहेत. वातावरणातील बदलामुळे हे दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्दी, खोकला आणि छातीत अधिक प्रमाणात कफ होत असल्याची लक्षणे दिसून येत आहेत. काही लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज निर्माण होते. व्हायरल फिव्हर होत असल्याची अनेक प्रकरणेही समोर आली आहेत. या आजारात व्यक्तीला अचानक ताप चढू लागतो. दिवसभर प्रकृती ठीक वाटणारी व्यक्ती तापाने फणफणू लागते.
ताप, सर्दी, खोकला, कफ, अंगदुखी सारखी लक्षणे प्रामुख्याने आढळत आहेत. व्हायरल फिव्हर किंवा डेंग्यू, न्यूमोनियासारख्या आजारांचे निदान होऊ शकते. यापासून काळजी काय घ्यायची असा प्रश्न जर पडला असेल तर सकस आहार, पुरेशा प्रमाणात पाणी पिणे, बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळून आणि पुरेशी झोप या गोष्टी महत्त्वाच्या असतात. याने आजारांना स्वत:पासून दूर ठेवता येऊ शकते.