उरुळी कांचन, (पुणे) : दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून शासकीय कंत्राटदार विठ्ठल पोळेकर यांचा खून करणाऱ्या मुख्य फरारी आरोपीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे ग्रामीण व हवेली ग्रामीण पोलिसांनी आवळल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी बुधवारी (ता. 08) दिली.
योगेश ऊर्फ बाबु किसन भामे (वय 32, रा. डोणजे, ग्रामपंचायत जवळ, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. आरोपी योगेश भामे याच्यावर शरीराविरूद्धचे 09 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, फसवणूक, अतिक्रमण, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने आरोपीला रिमांड पोलीस कस्टडी मंजूर केली आहे.
या अगोदर पोलिसांनी आरोपी शुभम पोपट सोनवणे (वय 24, रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), मिलिंद देविदास थोरात (वय 24,रा. बेळगाव, कर्जत, जि. अहिल्यानगर), यांना ताब्यात घेतले असून ते सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड पायथ्याजवळील डोणजे गावात विठ्ठल सखाराम पोळेकर (वय 70) राहायला होते. 15 नोव्हेंबर रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे सिंहगड पायथा परिसरात फिरायला गेले होते. ते घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोळेकर याचे अपहरण करुन खून करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले होते.
विठ्ठल पोळेकर यांनी पायगुडे वाडी ते गोळेवाडी रस्त्याचे शासकीय कामाचा ठेका घेतला होता. त्या कामात कोणताही अडथळा करू नये म्हणून योगेश ऊर्फ बाबु किसन भामे याने विठ्ठल पोळेकर यांचे कडे खंडणी म्हणून एक जॅग्वार कंपनीची चारचाकी कार मागितली होती. त्याची पुर्तता न केल्यास विठ्ठल पोळेकर व त्यांचा मुलगा प्रशांत पोळेकर यांचा खुन करण्याची धमकी दिली होती.
डोणजे गावातील योगेश ऊर्फ बाबु किसन भामे हा त्याचा मोबाईल बंद करून गावात नसल्याने त्यानेच विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण केल्याची खात्री झाल्याने योगेश भामे आणि त्याचे साथीदार यांच्यावर हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदरचा गुन्हा हा निवडणुक आचारसंहिता कालावधीत घडला होता. स्थानिक गुन्हे शाखा व हवेली पोलीस पथकांनी समांतर तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी गुन्ह्यात वापरलेली कार ही डोणजे गावातील गणेश चोरमले यांची असल्याची आणि ती कार दोन दिवसापासून योगेश भामे हा वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
तसेच योगेश भामे आणि त्याचे साथीदार शुभम सोनवणे व मिलींद थोरात यांचा सहभाग गुन्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले होते. दरम्यान, हे तिघे आरोपी नाशिक येथून रेल्वेने गोरखपूर बाजूकडे जात होते. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जबलपूर येथून रेल्वे पोलीसांच्या मदतीने त्या दोघांना ताब्यात घेतले होते.
दरम्यान, गुन्ह्यातील मुख्य आरोपी योगेश भामे हा फरार होता. त्याचे शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके तैनात करण्यात आली होती. आरोपीचा शोध घेत असताना आरोपी योगेश भामे हा सातारा ते पुणे रोडवरील सारोळा पुलाजवळील परिसरात असल्याची बातमी पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे व हवेली पोलिसांच्या पथकाने त्या परिसरात सापळा लावून आरोपी योगेश ऊर्फ बाबु किसन भामेला ताब्यात घेतले. पुढील तपास हवेली पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात येत आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी, हवेली विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, हवेली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, हवेली पोलीस ठाण्यातील अंमलदार संतोष भापकर, दिपक गायकवाड, संतोष तोडकर यांनी केली.