कदमवाकवस्ती येथे तिहेरी अपघात; दुचाकी चालक गंभीर जखमी, बहिणीच्या लग्नाहून घरी जाताना घडली दुर्घटना
लोणी काळभोर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टँकर, कार व दुचाकी या वाहनांचा तिहेरी अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील वाकवस्ती परिसरात सोमवारी (ता. 6) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बहिणीचे लग्न आटोपून माघारी जाताना झालेल्या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. आकाश कांतीलाल वाघमारे (वय-24, रा. पुणे) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आकाश वाघमारे हा पुण्यातील एका खाजगी कंपनीत काम करीत आहे. आकाशच्या बहिणीचा विवाह पंढरपूर येथील एका तरुणाशी ठरला होता. आकाश या विवाहासाठी दुचाकीवरून पंढरपूरला गेला होता. बहिणीचा विवाह आटोपल्यानंतर आकाश दोन दिवसानंतर माघारी पुण्याकडे कामावर जाण्यासाठी सोमवारी निघाला होता.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकीवरून जात असताना आकाशची दुचाकी वाकवस्ती परिसरात सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आली असता, त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि आकाशाने समोरील टँकरला धडक दिली. या धडकेत आकाश खाली पडला. त्यानंतर पाठीमागून आलेल्या कारने त्याला फरफटत नेले, यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ लोणी काळभोर (ता. हवेली) येथील शिवम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
मात्र त्याची प्रकृती बिघडत चालल्याने त्याला पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. त्याची प्रकृती अजूनही गंभीर आहे. त्याच्या हातावर व मानेवर शश्त्राक्रिया करण्यात येणार आहेत, अशी माहिती आकाश च्या नातेवाईकांनी दिली आहे. मात्र, याप्रकरणी अद्यापही लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.