पुणे : दोन विद्यार्थिनींना बसचालकाने स्कूल बसमधून उतरू न देता बसमध्ये मोठ्याने गाणी लावून त्यांच्यासोबत गैरवर्तन करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये गुरुवारी (ता. ८) रोजी घडली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी बसचालकाला बेड्या ठोकल्या असून पिंकू कुमार (वय 30) असे अटक करण्यात आलेल्या बसचालकाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी आणि तिची मैत्रीण स्कूल बसमधून रोज घरी जात असताना आरोपी बसचालक बसमध्ये मोठ्याने गाणी लावून त्यांच्याकडे चुकीच्या नजरेने बघत होता. तसेच त्यांनी त्याला गाण्याच्या आवाज कमी करण्यास सांगितले असता, आरोपीने तुम्हाला काय करायचे ते मी गाणी मोठ्याने लावणार असे म्हणाला.
त्यानंतर आरोपीला राग आल्याने त्याने फिर्यादी फोनवर बोलत असताना तिचा फोन बाहेर फेकून दिला, आणि बस जोराने चालवली. काही अंतरावर बस बंद पडल्याने बसमधील मुले खाली उतरली.
दरम्यान, आरोपीने फिर्य़ादी आणि तिच्या मैत्रिणीला बसमधून उतरू दिले नाही. तसेच फिर्यादी आणि तिच्या मैत्रिणीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकणी एका विद्यार्थीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार बसचालक पिंकू कुमार याच्यावर आयपीसी 354, 279, पॉक्सो कायद्यानुसार (POCSO Act) गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.