अजित जगताप
सातारा : खटाव तालुक्यातील १५ ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. या ठिकाणी १५ सरपंच व १२७ ग्रामपंचायत सदस्य या जागेसाठी निवडणूक होत आहे. सदर निवडणुकीसाठी३२ सरपंच पदासाठी व १७२ ग्रामपंचायत सदस्यांसाठी अर्ज दाखल करण्यात आले आहे.
मतदान प्रक्रियेबाबत प्रशिक्षण घेण्यात आले असून तहसीलदार किरण जमदाडे व नायब तहसीलदार करणे यांनी आज मतदान प्रक्रियेबाबत सहभागी होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेतले.
मतदान केंद्रावरील कर्तव्य पार पाडण्यासाठी खटाव पंचायत समितीच्या बचत सभागृह वडूज या ठिकाणी आज पहिले प्रशिक्षण झाले. दुसरे प्रशिक्षण दि १४ डिसेंबर व तिसरे प्रशिक्षण खटाव (वडूज) प्रशासकीय इमारतीत १७ डिसेंबर रोजी होणार असून १८ डिसेंबरला मतदान होणार आहे.
मायणी, मासुणे, ललगुण, शिंदेवाडी, नागनाथवाडी, लांडेवाडी, त्रिमली, भूषणगड, होळीचागाव, मुसाळवाडी, गोरेगाव (निम), राजाचे कुर्ले, गिरजाशंकरवाडी, मरडवाक, खातवळ अशा १५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत.
निवडणूक प्रक्रिया समजून घेण्यासाठी स्वतः खटाव तहसीलदार किरण जमदाडे, नायब तहसीलदार सचिन कर्णे यांनी प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली. मतदान केंद्र अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित केली असून कशाप्रकारे मतदान प्रक्रिया पार पाडावी याबाबत प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणासाठी ग्रामसेवक तलाठी व शिक्षक वर्ग उपस्थित होते. विशेष म्हणजे या प्रशिक्षण कार्यक्रमामधून महिला अधिकारी- कर्मचारी यांना वगळण्यात आल्यामुळे त्यांची उपस्थिती नव्हती.
विशेष म्हणजे प्रत्येक ठिकाणी महिलांना आरक्षण असतानाही महिला मतदान केंद्रावर त्यांची नियुक्ती व्हावी. ज्यामुळे कार्यक्षम मतदार महिलांचा मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी सहभाग होईल.
किमान जवळच्या ग्रामपंचायतीच्या मतदान केंद्रावर नियुक्ती व्हावी, अशी मागणी पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते व सिद्धेश्वर कुरवली येथील माजी सरपंच राजू फडतरे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता केंगारे, विजयकुमार शिंदे व रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कृणाल गडांकुश, नितीन भोसले यांनी केली आहे.