चाकण : जेवणात मीठ कमी पडल्याचा राग मनात धरून एका ढाबा चालकाने आचाऱ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना चाकण (ता. खेड) परिसरात नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिंपरी- चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक ३ च्या पोलिसांनी दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे.
ओंकार अण्णा केंद्रे (वय- २१) आणि कैलास अण्णा केंद्रे (वय १९, मूळ राहणार दिग्रस जि. नांदेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर प्रसेनजीत गोराई (वय ३० रा.पश्चिम बंगाल) असे खून झालेल्या आचाऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओंकार आणि कैलास हे दोघे सख्खे भाऊ आहेत. त्यांनी चाकण – शिक्रापूर रोडवर ढाबा चालवण्यासाठी घेतला होता. तर मृतक प्रसेनजीत गोराई हा त्यांच्याकडे नुकताच कामाला लागला होता. आचारी प्रसेनजीत गोराई हा जेवण बनवीत असताना, त्याच्याकडून जेवणात मीठ कमी जास्त होत होते. त्यामुळे आरोपी ढाबा चालक ओंकार, कैलास यांच्यामध्ये प्रसेनजीत सोबत वाद होत होते.
ऑक्टोबर महिन्यात जेवणात मीठ कमी का? पडले यावरून आरोपी आणि यांच्यात टोकाचा वाद झाला. त्यानंतर आरोपींनी आचारी प्रसेनजीत च्या डोळ्यात चटणी टाकून लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत आचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर एक दिवस मृतदेह ढाब्याच्या आतील खोलीत ठेवण्यात आला, इतर कामगारांना दमदाटी करून त्यांना शांत राहण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी तो मृतदेह ओढ्यात फेकून दिला. दरम्यान, ६ नोव्हेंबर रोजी आचाऱ्याचा मृतदेह आढळला. त्याची चौकशी करण्याऐवजी चाकण पोलिसांनी शवविच्छेदन अहवालाची वाट पाहात अकस्मात मृत्यूची नोंद केली.
दरम्यान, पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक ३ चे पोलिस अधिकारी शैलेश गायकवाड यांच्या पथकाला माहिती मिळाली की, तो अकस्मात मृत्यू नसून खून आहे. आणि हा खून ढाबा चालकाने केला आहे. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक गिरीश चामले हे इतर एका साथीदाराला घेऊन ग्राहकाच वेषांतर करून त्या ढाब्यावर गेले. आणि पोलिसांनी तिथे जेवण केले
त्यानंतर पोलिसांनी ढाबा चालक कैलास आणि ओंकार चा विश्वास संपादन केला. मग, दोन्ही आरोपींसोबत फोटो काढून तो खबऱ्याला दाखवला आणि त्यांनीच खून केला असल्याच पुढील तपासात निष्पन्न झाले आहे.