दौंड, (पुणे) : दौंड तालुक्यातील माळवाडी येथे अज्ञात कारणावरून एका 18 वर्षीय तरुणाने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी (ता. 26) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
दिनेश दिलीप महाडीक, (वय 18, रा. माळवाडी ता. दौंड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मयताचे वडील दिलीप दगडु महाडीक (वय- 52) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप महाडीक हे पत्नी, तीन मुली व एक मुलासह माळवाडी येथे राहतात. गुरुवारी सकाळी दिलीप महाडिक व त्यांचा मित्र उत्तम येडे हे देवदर्शन करण्यासाठी गेले होते. तर घरी सायंकाळी गोटयाजवळ असलेल्या चुलीवर पत्नी मनीषा स्वयंपाक करीत होती. मुलगी तेजस्वीनी ही शाळेतुन आली व घरातील खोलीत गेली. त्यावेळी तिने मोठमोठयाने ओरडुन तीच्या आईला आवाज दिला.
मुलगी का आवाज देत आहे हे पाहण्यासाठी घरातील खोलीत मनीषा गेली असता, मुलगा दिनेश हा पंख्यांसाठी काढलेल्या गजाला दोरीच्या सहायाने गळफास घेवुन लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याला खाली घेऊन मनीषा व मुलीने गळ्याची रश्शी काढुन गळफास सोडविला. त्यानंतर त्याला उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासुन तो उपचारापूर्वीच मयत झाला असल्याचे सांगितले.
दरम्यान, सदर घडलेल्या प्रकाराबाबत कोणाविरूध्द काही एक तक्रार नाही. तसेच कोणावरही वहीम अगर संशय नाही तरी पुढील तजवीज व्हावी असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार ढूके करीत आहेत.