पुणे : पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहक सेवा कक्षातून बोलत असल्याचे सांगून खात्याची माहिती घेऊन एका महिलेला सुमारे सव्वा लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याची घटना विश्रांतवाडी परिसरात घडली आहे. याबाबत ४९ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे पंजाब नॅशनल बँकेत खाते आहे. महिलेला अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. माझे नाव राहुल शर्मा असून, मी पंजाब बँकेच्या ग्राहक सेवा कक्षातून बोलत असल्याचे समोरील व्यक्तीने सांगितले. ‘एटीएम’द्वारे तुमच्या खात्यातून वजा झालेले वीस हजार रुपये परत करतो, असे महिलेला सांगण्यात आले.
महिलेचा विश्वास मिळविल्यानंतर त्याने महिलेला खात्याची माहिती विचारली. त्यानंतर मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक विचारला. महिलेने ओटीपी सांगितल्यानंतर खात्यामधून ९१ हजार ६०० व दुसऱ्या खात्यातून २८ हजार ८९० रुपये काढून घेण्यात आले. एक लाख २० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेले विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे तपास करीत आहेत.