वाघोली, (पुणे) : वाघोलीतील बाईफ रोड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरावर पहाटे आलेल्या अज्ञातांकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबारामध्ये घराच्या काचा फुटल्या असून या गोळीबारात कोणीही जखमी झाले नसले तरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी (ता. 25) पहाटे साडेचारच्या सुमारास हा गोळीबार झाला आहे.
निलेश सुभाष सातव (वय – 35, रा.वडजाई वस्ती, वाघोली, ता. हवेली) यांच्या घरावर गोळीबार झाला असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाघोलीतील वडजाई परिसरात आव्हाळवाडी रोडवर असलेल्या बाईफ रोडवर निलेश सातव राहतात. पहाटे त्यांच्या घरावर गोळीबार झाला. यावेळी घटनास्थळी पुंगळी आढळून आली.
घटनेची माहिती कळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेतली. घराच्या खिडकीतून अज्ञात व्यक्तीने पहाटेच्या सुमारास गोळीबार केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांकडून हल्ले खोरांचा शोध सुरू केला असून गोळीबार का करण्यात आला याचे कारण अद्याप कळू शकले नाही.
दरम्यान, पहाटे पुन्हा गोळीबाराची घटना घडल्याने वाघोली व परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याचे नागरिक चर्चा करू लागले आहेत.