बारामती, (पुणे) : सुपे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंदिरातील पितळ धातूच्या समई व घंटा चोरणाऱ्या एका अल्पवयीन बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल 31 हजार 500 रुपयांच्या 11 घंटा ताब्यात घेतल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुपे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वढाणे, मोरगाव, तरडोली, खंडूखैरेवाडी, कार्हाटी, दंडवाडी, बाबुर्डी , पानसरेवाडी गावातील मंदिरातून घंटा चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. पोलीस तपास करीत असताना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की, गावातील मंदिरातील घंटा या एका अल्पवयीन मुलाने चोरी केल्या आहेत.
दरम्यान, पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गावातील मारुती मंदिर, महादेव मंदिर, जानाई मंदिर, सावता माळी महाराज मंदिर, बाबीर मंदिरातील पितळी घंटा आणि समई चोरल्याची माहिती दिली. त्याच्याकडून पोलिसांनी 31 हजार 500 रुपयांच्या 11 घंटा ताब्यात घेतल्या आहेत. पुढील तपास पोलीस हवालदार एस. एस. लोंढे हे करत आहेत.