उरुळी कांचन, (पुणे) : सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील मुठा उजवा कालव्यात एका 45 ते 50 वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आळंदी म्हतोबाची – सोरतापवाडी शिवेवर असलेल्या कॅनॉल ब्रिज जवळ मंगळवारी (ता. 24) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला आहे. उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे हवालदार रमेश भोसले यांनी याबाबत माहिती दिली. याप्रकरणी तुषार रामदास चोरगे, (वय 36, व्यवसाय शेती रा. सोरतापवाडी ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी म्हातोबाची – सोरतापवाडी शिवेवर असलेल्या कॅनॉल ब्रिज जवळून तुषार रामदास चोरगे हे त्याच्या घरी निघाले होते. यावेळी सोरतापवाडी गावच्या हद्दीत गुंजाळ मळा परिसरातील कॅनॉल ब्रिज जवळ लोकांची गर्दी दिसल्याने त्यांनी गाडी थांबवून गर्दी का झाली हे पाहण्यासाठी गेले. यावेळी कॅनॉलच्या पाण्यात एक पुरूष जातीचे प्रेत वाहत आल्याचे दिसून आले.
दरम्यान, तुषार चोरगे यांनी तात्काळ उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार निलेश जाधव, गणेश दाभाडे हे पोहोचले. त्यांनी पाहणी केली असता एक पुरूष जातीचे अनोळखी मयत अंदाजे वय 45 ते 50, त्याच्या अंगात फुल भायाचा लाल रंगाचा टि शर्ट, पॅन्ट नसलेली, रंग सावळा, पायात काही एक नाही. टी शर्टवर इंग्रजीमध्ये सी.एच.आय. सी. असे लिहलेला मृतदेह आढळून आला. सदर मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला असून तपास पोलीस हवालदार रमेश भोसले करीत आहेत.
दरम्यान, सदर मयत झालेल्या अनोळखी इसमाची ओळख पटविण्याचे काम उरुळी कांचन पोलिस करीत असून कोणाला मयत पुरुषाबाबत काही माहिती असल्यास उरुळी कांचन पोलीस ठाणे 020-26926287 तसेच पोलीस हवालदार रमेश भोसले – 9823 644 744 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.