लोणार, (बुलढाणा): येथील ग्रामीण रुग्णालयात लागलेल्या आगीत होरपळून एका रूग्णाचा मृत्यू झाल्याची घटना २३ डिसेंबर रोजी सकाळी ३.४५ मिनिटांनी उघडकीस आली आहे. रूग्णालयात आग रूग्णाने बिडी पेटविल्यामुळे तर काहींनी शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगितले.
याबाबत सविस्तर असे की, २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ग्रामीण रुग्णालयात फोन आला की, लोणार बस स्थानकावर अनोळखी व्यक्ती आजारी आहे. त्यानंतर १०८ नंबरच्या अॅम्बुलन्सने रुग्णालयात ४.३५ वाजता मनोरुग्ण हरिभाऊ बापूजी रोकडे (वय ६५ रा. पैठण) यास दाखल करण्यात आले. रात्री वैद्यकीय अधिकारी शोएब शहा, कक्षसेवक बळीराम खरात, परिचारिका माने, सुरक्षा रक्षक उद्धव वाटसर यांची ड्युटी होती. सकाळी ३.४५ मिनिटांनी रुग्णालयाला आग लागल्याची माहिती सुरक्षारक्षकाने रुग्णालयात असलेल्या कर्मचाऱ्यांना दिली. ज्या रुमला आग लागली होती, त्या ठिकाणी कर्मचारी पोहोचण्याच्या अगोदरच रुग्णांचा जळून अक्षरशः कोळसा झाला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी कर्तव्यावर उपस्थित असलेले कर्मचारी रात्रीला झोपलेले असल्यामुळे आग लागल्याची त्यांना माहिती झाली नाही. कर्मचारी जागे असते तर रुग्णाचा जीव गेला नसता, अशी उलट सुलट चर्चा ऐकायला मिळत होती.
रुग्ण हा मनोरुग्ण होता व त्यांने बिडी पेटविल्यामुळे आग लागली, तर काही कर्मचाऱ्यांनी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगोले, पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन खराडे हे करीत असून आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास करीत आहे. रुग्णाच्या नातेवाईकांचा शोध न लागल्यामुळे पोस्टमार्टम केल्यानंतर तहसीलदार यांच्या परवानगीने नगरपालिकेने रुग्णावर १.१५ मिनिटांनी अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती पोलीस सहाय्यकनिरीक्षक इंगोले यांनी दिली.