कवठेमहांकाळ : रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथील टोलनाक्याजवळ सुझुकी कंपनीच्या वॅगनार गाडीने अचानक पेट घेतल्याने एका युवकाचा भाजून मृत्यू झाला आहे. गणेश विश्वनाथ माळवदे (वय २४, रा. कवठेमहांकाळ) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री दहाच्या दरम्यान घडली. या घटनेची कवठेमहांकाळ पोलिसात नोंद झाली आहे.
कवठेमहांकाळ लांडगेवाडी नृसिंहगाव येथे विश्वनाथ माळवदे यांचे दत्तकृपा मोटर ड्रायव्हिंग स्कूल आहे. रविवारी रात्री दहा वाजता माळवदे यांचा मुलगा गणेश हा अलकूड येथील सीएनजी पंपावर व्हॅगनार गाडी (एम एच ०२ सी झेड ३५२९) मध्ये सीएनजी भरण्यासाठी निघाला होता.
मात्र, गाडी रत्नागिरी- नागपूर महामार्गावरील बोरगाव येथील टोल नाक्याजवळ आली असता गाडीने अचानक पेट घेतला त्यावेळी गाडीतून बाहेर पडता न आल्याने गणेश याचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला. यावेळी जॉली बोर्ड येथील अग्निशामक गाडीने आगीवर नियंत्रण आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत गाडीमधील गणेश माळवदे याचा मृतदेह जळून खाक झाला होता. यावेळी गाडीमध्ये मृतदेहाचा नुसता सांगाडा शिल्लक राहिला होता. गाडीमध्ये अचानक होरपळून झालेल्या मृत्यूच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.