धाराशिव : राज्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून मोठा वाद सुरू असतांना आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्या दोन्ही पुतण्यांना तुमचा संतोष देशमुख करू, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून या प्रकरणी धारशिव पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेरणा कारखान्याचे शेतकरी अधिकारी मच्छिंद्र पुंड व सुनिल लगडे, संजय निपाणीकर यांनी या प्रकरणी धारशिव येथील ढोकी पोलिस चौकीत तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेरणा साखर कारखान्यासाठी ऊस वाहतुक करणारा एक ट्रॅक्टर तेर-ढोकी रोडवर निघाला होता. आरोपी हे दुचाकीवरून आले व त्यांनी चालकाला रस्त्यात अडवत एका बंद पाकीटामध्ये 100 रुपयांच्या नोटेसोबत ही धमकीची चिठ्ठी दिली. त्यांनी कारखान्यासाठी हे टपाल असल्याचे सांगितले.
दरम्यान, हे पाकीट तेरणा कारखान्यावर सुरक्षा रक्षकाला देण्यास सांगितले. हे पाकीट उघडण्यात आले. तेव्हा चिठ्ठीमध्ये तानाजी सावंत यांचे पुतणे व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत तसेच तेरणा कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव सावंत यांना तुमचा संतोष देशमुख करू, अशी जीवे मारण्याची धमकी दिली. या सोबतच त्यात तुमचाही संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल, असे लिहून धमकावण्यात आले आहे. धमकीचे हे पत्र देणारे ते दोघे कोण होते ? याच देखील तपास सुरू करण्यात आला आहे.