नागपूर : विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. राज्यातील गेले काही वर्ष रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत संकेतही दिले आहेत. राजकीय पक्षांना 22 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांवरील सुनावणीची प्रतीक्षा आहे.
मात्र, प्रत्यक्षात 4 जानेवारी रोजीच सुनावणी होण्याची शक्यता असून, 3 महिन्यांत निवडणुका व्हायला हव्यात, असा प्रयत्न असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. नवनियुक्त मंत्री, आमदार यांच्या उपस्थितीत नागपुरात कार्यकर्त्यांच्या सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, विधानसभेतील विजयामुळे सरकार, लोकप्रतिनिधी व पक्षावरील जबाबदारी वाढली आहे. सर्वांनी जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. सरकार व जनतेदरम्यान संघटनेमार्फत समन्वय राहावा असा भर राहणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तिघांमध्येही योग्य समन्वय असला तर काय होऊ शकते हे विधानसभेतील निकालांतून समोर आले आहे. भाजपचे कार्यकर्ते निवडणुकीत अक्षरशः जादूगारच झाले होते, असे कौतुकौद्गार मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
पुढे बोलताना म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय मिळवायचा असेल तर काही दिवसांत सदस्यता नोंदणीवर भर द्यावाच लागेल. राज्यात दीड कोटी सदस्यता नोंदणी व्हायला हवी. प्रत्येक बूथवर दीडशे सदस्यांच्या नोंदणीचे टार्गेट असायला हवे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.