आणे (पुणे): जिओ कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करून भामट्याने एका महिलेच्या खात्यातून ३ लाख २८ हजार रुपयांची रक्कम गायब केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत दीपाली दिनकर आंग्रे यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आळेफाटा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीपाली आंग्रे यांना ७ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीचा फोन आला. त्याने जिओ कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. जिओ कंपनीची टेस्टिंग चालू आहे, तुम्ही फोन उचलू नका असे बोलल्यामुळे पती दिनकर आग्रे यांनी फोन कट केला. त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी दिनकर यांच्या मोबाईलवर चार-पाच मेसेज आले. परंतु, त्याच्याकडे दुर्लक्ष केले.
त्यानंतर थोड्याच वेळात मोबाईलची रेंज गेली व फोन येणे-जाणे बंद झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.८) दिनकर यांनी जिओ मोबाईल कंपनीच्या गॅलरीमध्ये जाऊन चौकशी केली असता त्यांना असे कळले की, गॅलरी १० तारखेपर्यंत बंद आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जिओ कंपनीच्या गॅलरीमध्ये जाऊन मोबाइलचे सिमकार्ड बंद पडले असल्याबाबत चौकशी केली असता तेथील जिओ कंपनीच्या कर्मचाऱ्याने मोबाइलचे सिमकार्ड खराब झाले असल्याचे सांगून नवीन जिओ कंपनीचे सिमकार्ड दिले.
सदरचे सिमकार्ड दुपारी अडीच वाजता सुरू झाल्यानंतर मोबाईलवर बँकेचा मेसेज आला असता त्यामध्ये अकाउंटवर २५०० रुपये असल्याचे समजले. त्यानंतर बेल्हे येथील बँकेत जाऊन सदरबाबत चौकशी केली असता अकाउंटवरून ३ लाख २८ हजार रुपये काढून घेतले असल्याचे समजले. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश तायडे हे करत आहेत.