जेजुरी : काम येत नाही, शाइनिंग मारतो, नुसता टाईमपास करतो असे टोमणे मारणाऱ्या बांधकाम मिस्त्रीचा मजुराने खून केल्याची घडता जेजुरी (ता.पुरंदर) येथील अत्रे वाडा परिसरात असलेल्या कामगारांचे पत्र्याचे शेडमध्ये घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेसह पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आणि दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावासात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हे आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डि. पी. रागीट यांनी दिले आहेत.
राकेश अविनाश गायकवाड (वय २३, मुळ रा. लक्ष्मी नारायण नगर, गोंधवणी रोड, श्रीरामपुर, ता. श्रीरामपुर, जि. अहमदनगर, सध्या रा. अत्रेवाडा, जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर अविनाश रंभाजी महांकाळे (वय ४५, रा. बेलापुर, ता. श्रीरामपुर, जि. अहमदनगर सध्या रा. अत्रेवाडा, जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी योहान शमुवेल तोरणे (सध्या, रा. अत्रेवाडा, शिवलिला प्रोजेक्ट, जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे मुळ रा. पडेगाव, ता. श्रीरामपुर, जि. अहमदनगर) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सदर प्रकार हा 14 फेब्रुवारी 2018 रोजी रात्री साडे दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योहान तोरणे हे जेजुरी येथील एका बांधकामाच्या साईटवर इंजिनिअर म्हणून नोकरी करीत होते. बिल्डरने कामगारांना राहण्यासाठी तिन पत्र्याचे शेड बांधुन दिले होते. त्यातील एका शेडमध्ये सेंट्रीग मिस्त्री म्हणुन अविनाश महांकाळे, कामगार राकेश गायकवाड, विशाल उर्फ बाळु खंडागळे व स्वत: फिर्यादी योहान तोरणे राहत होते. व इतर कामगार तेथेच बाजुच्या शेडमध्ये राहात होते.
दरम्यान, फिर्यादी योहान तोरणे यांना अविनाश महाकळे हा 14 फेब्रुवारी 2018 रोजी सांगत होता की, राकेशला काम येत नाही. तो नुसताच शाइनिंग मारतो? असे म्हणत असताना तेवढयात तेथे राकेश गायकवाड आला. राकेशने अविनाशचे बोलणे ऐकले होते. या बोलण्याचा राग अनावर झाल्याने राकेशने अविनाशला शिवीगाळ करून हाताने मारहाण करू लागला. त्यानंतर राकेशने कांदा कापण्याचा चाकू हातात घेवून अविनाश महाकांळे यांच्या गळ्यावर मारला.
यात गंभीर जखमी होऊन राकेशचा मृत्यू झाला. याप्रकरणी योहान तोरणे यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपी राकेश गायकवाड याच्याविरोधात खुनासह विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी राकेश गायकवाडला तातडीने बेड्या ठोकल्या होत्या.
सदर गुन्ह्याचा खटला हा पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात सरकारी वकील ॲड. लीना पाठक यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी राकेश गायकवाड याला जन्मठेपेसह पाच हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. हे आदेश पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डि.पी.रागीट यांनी दिले आहेत.
या खटल्यात सरकारी वकील ॲड. लीना पाठक यांना उपविभागीय पोलीस अधिकारी आप्णासाहेब जाधव, जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाघचौरे, पोलीस उपनिरीक्षक विद्याधर निचीत पोलीस उपनिरीक्षक आर .व्ही माळेगावे व पोलीस हवालदार कैलास काळे यांची मदत मिळाली.