पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या आठ पदरी विस्तारासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एमएसआरडीसीच्या योजनेला लवकरच महाराष्ट्र मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. आचारसंहिता आणि निवडणुकीच्या धामधूमीत मागील वर्षभरापासून रखडलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या रुंदीकरणाला मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाल्यास मुंबई-पुणे महामार्गावरील प्रवास आणखी वेगवान होणार आहे.
मुंबई-पुणे या ९४ किलोमीटर लांबीच्या द्रुतगती मार्गाच्या विस्ताराची योजना आहे. मुंबई ते पुणे महामार्ग तीन लेनवरून आठ लेनचा करण्यात येणार आहे. या मार्गाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव गेल्या वर्षी सादर करण्यात आला होता, मात्र निवडणुकीमुळे तो लांबणीवर पडला. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या विस्तारासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या योजनेला येत्या दोन महिन्यांत राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व भागधारकांच्या शिफारसी लागू केल्यामुळे कॅबिनेट लवकरच प्रकल्प मंजूर करेल, अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने व्यक्त केली आहे.
वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने माडप व भाताणजवळील बाजूच्या एका मार्गिकचा समावेश करण्याचा प्रस्ताव दिला आहे. तसेच कामशेतजवळ प्रत्येक बाजूला दोन लेनचा समावेश आहे. विस्ताराची प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे. राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर, टप्पा १साठी २,५०० कोटी रुपये देण्यात येणार आहेत, तर एकूण प्रकल्पातील बांधकाम आणि भूसंपादनाचा खर्च ग्राह्य धरून प्रकल्प खर्च ५ हजार कोटी रुपये आहे. सध्या मुंबई-पुणे महामार्गावरून ६० ते ७० हजार वाहने, तर आठवड्याच्या शेवटी ९० हजारांपर्यंत वाहने प्रवास करतात.