उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतून नर्सरी कामगाराच्या एका 12 वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. गुरुवारी (ता. 19) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या आईने तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधीत अल्पवयीन मुलगी परिवारासह उरुळी कांचन परिसरात वास्तव्याला असून आईवडील हे एका नर्सरीत काम करतात. गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून तिला पळवून नेले. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु ती कुठेही मिळून आली नाही.
दरम्यान, उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्यानुसार पुढील कार्यवाही सुरु आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण कांबळे करीत आहेत.