दीपक खिलारे
इंदापूर : राज्यस्तरीय ‘शरद कृषी महोत्सव २०२२’चे उद्घाटन गुरुवारी (ता. ८) होणार आहे. हे प्रदर्शन १२ तारखेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. प्रदर्शनादरम्यान विविध उपक्रमाचे आयोजन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. महोत्सवात २०० प्रकारचे विविध स्टॉल्स असणार आहेत.
इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शहरातील नवीन तहसील कचेरी शेजारील प्रांगणात हा महोत्सव आयोजित केला आहे. महोत्सवाचे उद्घाटन सायंकाळी पाच वाजता माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते होणार आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, ज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता खास महिलांसाठी खेळ पैठणीचा व महिला मेळावा होणार आहे.
या कार्यक्रमास शनिवारी सकाळी ११ वाजता खासदार अमोल कोल्हे, दत्तात्रेय भरणे व आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत युवक मेळावा होणार आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता शेतकरी मेळावा व १२ डिसेंबर रोजी पाच वाजता या कृषी महोत्सवाचा समारोप होणार आहे.
शरद कृषी महोत्सवातील आयोजित चर्चासत्राच्या माध्यामातून डाळिंब, लिंबूवर्गीय फळबाग व पेरू यासह दुग्ध व्यवसाय, आधुनिक शेती तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, शेळी मेंढी पालन व्यवस्थापन, फुले शेती भाजीपाला, हरितगृह आधुनिक तंत्रज्ञान यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. प्रगतशील शेतकरी हे आपल्या याशोगाथा शेतकऱ्यांसमोर मांडणार आहेत